Table of Contents
सध्या राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नाही नाही म्हणता आता पावसाने अगदी चांगलाच जोर धरायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी नद्यांना पुर येत आहेत. तर काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळित होत आहे. फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर आता शहरी भागातही पाऊस चांगलाच कोसळायला लागला आहे. याचदरम्यान आज मुंबईत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात बहुतांश भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मुंबईसह घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडणार आहे. मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून जरी पावसाने जोर धरला असला, तरी आज अर्थात शनिवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भाच्या काही भागात वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तर मुंबई आणि उपनगरांत गुरुवारपासूनच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार मुंबईत अगदी गुरुवारपासून नाही तर शुक्रवार पासून पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यात शनिवारपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
या जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Add Comment