Table of Contents
वसईत भररस्त्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीला लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. या प्रकरणामुळे वसईत (Vasai) खळबळ माजली आहे. ही घटना वसई पूर्वेच्या गेवराई भागात घडली आहे. आरोपीचे नाव रोहित यादव असून त्याच्या प्रेयसीचे नाव आरती आहे. या प्रकरणात लक्ष घालत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
या हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओत मन हेलावून टाकणारी दृश्य दिसत आहेत. या व्हिडिओत दिसून येत रोहित आरतीवर १५ वेळा लोखंडी पान्याने वार करताना दिसत आहे. त्याने वार केल्यावर आरती मृत अवस्थेत तिथे पडलेली दिसून आली आणि तिथे असलेल्या जमावाने बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. रोहित आरतीच्या मृत देहाला जाब विचारताना दिसला. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
आरोपी रोहित आणि आरतीचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिन्याभरापूर्वीच दोघांनी त्यांचे नाते संपवले होते. रोहितला आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता आणि याच संशयातून त्याने आरतीचा खून केला असल्याचे म्हटले जात आहे.
वसई खून प्रकरणी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून ते म्हणाले, “वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे.”
सुषमा अंधारेंनीही दिली प्रतिक्रिया
याप्रकरणावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “वसई मध्ये झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे. दिवसाढवळ्या एका तरुणीची भर रस्त्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात. लोक आजूबाजूंनी जात आहेत परंतु ते लोक नुसते बघत आहेत. हे चित्र संपूर्ण विदारक आहे. सध्याचा कायद्याचा बदगा जो आहे तो चोर सोडून सन्यासाना फाशी की काय अशा प्रकारे वाटायला लागतं.
मदत करायला आलेल्या माणसांना आपल्यालाच विनाकारण पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील की काय असं वाटतं. या भीतीने अशा वादात कोणी पडत नाही. या भीतीने तिच्या मदतीला कोणीही जात नाही. परंतु या निमित्ताने मुंबई लगतच्या भागात जेव्हा अशी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी दुर्दैवी घटना घडण हे महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डर वर प्रश्नचिन्ह लावणार आहे.”
Add Comment