Table of Contents
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा लगतच्या राज्यात पावसानं (rain) चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे इतर नागरिकांची जरी तारांबळ उडाली असली तरी, शेतीच्या कामांना वेग आल्यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय. नाशिक शहरात (Nashik) देखील गुरुवारपासून पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने नाशिक शहराला झोडपले आणि यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे.
आज दुपारी पावसाने नाशिक शहरात हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर हा पाऊस अचानक कोसळू लागल्यामुळे काही नागरिकांची धावपळ देखील झाली. पाऊस येण्याची कल्पना नसल्यामुळे छत्री आणि रेनकोट न घेता घराबाहेर पडलेले नागरिक जवळील दुकानात आश्रय घेताना दिसले.
नाशिक शहरात सखल भागात साचले पाणी
नाशिक शहरात पडलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. सिडको, सीबीएस, सातपूर, शालीमार या परिसरांसह इतर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. फक्त तासभर पडलेल्या पावसाने नाशिकात अशी बिकट परिस्थिती निर्माण केल्यामुळे नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला.
सरकारी कामांची उडाली दैना…
शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे सरकारी कामांची दयनीय अवस्था निदर्शनास आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority of India) बेजबाबदारपणामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप झाला. उड्डाणपुलावर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्यामुळे, उड्डाणपुलावरून खाली कोसळत असणाऱ्या पाण्याला चक्क धबधब्याचे स्वरूप आले होते. उड्डाणपूलाखाली असणाऱ्या अर्धवट पाईपांमुळे पुलावरील पाणी खाली कोसळत होते. त्यामुळे पुलाखालून जाणाऱ्या नागरिकांचे सुद्धा हाल झाले.
शहरात नालेसफाईच्या कामांना आला वेग
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आता नाशिककरांसमोर डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाचा देखील प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या कितीतरी दिवसांपासून नाशिक शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीने जोर धरला आहे. त्यातल्या त्यात नाशिक शहरातील नंदिनी नदी (Nandini River) ही डासांच्या उत्पतीचे मुख्य हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने देखील आता नंदिनी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील आरोग्याची समस्या वाढत असल्यामुळे आता नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका सक्रियपणे काम करताना दिसत आहे.
Add Comment