Table of Contents
मराठी कलाकारांनी मराठी कलाकारांचा मान राखला पाहिजे. चारचौघात किंवा मग व्यासपीठावर मराठी कलाकारांशी मनानेच बोललं पाहिजे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १०० व्या नाट्य संमेलनात बोलत असताना मराठी कलाकारांचे कान टोचले. राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेवर आता अनेक मराठी कलाकारांनी देखील सहमती दर्शवली आहे. त्यातच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) २०११ सालच्या वर्ल्ड कपचा अनुभव सांगत राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे.
राज ठाकरे बोलले ते अगदी खरंय – सिध्दार्थ जाधव
नाट्य संमेलनात बोलताना राज ठाकरे हे काही म्हणाले ते अगदी खरंय. अशोक सराफ यांना तुम्ही अशोक मामा म्हणा पण चारचौघात त्यांना तुम्ही अशोक सरच म्हटले पाहिजे. अमिताभ बच्चन यांना तुम्ही काका म्हटलंय का कधी, अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीत जो मान आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच मान अशोक सराफ यांना मराठी सिनेसृष्टीत आहे. त्यामुळे राज साहेबांचं हे म्हणणं अगदी १०० खरं आहे.
सिद्धार्थ जाधवने सांगितलं वर्ल्ड कपचा किस्सा
स्वतःला आलेल्या एका अनुभवाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, मी २०११ मध्ये वर्ल्डकपसाठी लिहायचो. त्यामध्ये मी धोनी आणि सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूंसाठी लिहायचो. पण, त्यांच्याबाबत लिहिताना मी सचिन तेंडुलकरचा तेंडल्या असा उल्लेख करायचो. म्हणजे तेंडल्या सेंच्युरी मारणार म्हणजे मारणार असं. एके दिवशी मला एक फोन आला, हॅलो सिद्धार्थ जाधव का? राजसाहेब बोलतोय. पुढे ते म्हणाले की मी तुम्हाला कधी सिद्ध्या, सिद्धू अशी हाक वैगरे मारली आहे का? मी त्यावर म्हणालो की, नाही सर. पुढे ते म्हणाले की, सचिन तेंडुलकरला तुम्ही तेंडल्या म्हणता हे बरोबर आहे का? तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिता पण, मग त्यांचा आदर राखणही तितकाच गरजेचं आहे. त्यांची ती गोष्ट मला फार आवडली. म्हणजे सिद्धार्थ जाधव एक कलाकार आणि त्यालाही त्यांनी फोन करून काय करायचं हे अगदी आवर्जून सांगितलं.
ते मराठी कलाकारांचा आदर करतात
राजसाहेबांनी माझं काही मोहन प्यारे हे नाटक पाहिलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते की, सिद्धार्थ जाधव सारखी एनर्जी असणारा कलाकार आता इंडस्ट्रीत नाही. त्यांना प्रत्येक मराठी कलाकाराप्रती आदर आहे. कोणताही कलाकार जरी त्यांना भेटायला गेला तरी ते त्यांची चित्रपटांविषयीच बोलतात, ते त्यांच्याशी कोणत्याही राजकीय गप्पा मारत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो.
Add Comment