Table of Contents
काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात बाईक टॅक्सी (Bike Taxi) सुरू करण्याच्या मागणीला सरकारने सपशेल नकार दर्शवला होता. पण, आता याच मागणीचा फेरविचार करत महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात बाईक टॅक्सी (Bike Taxi) सुरू करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या बाईक टॅक्सी चालक कंपन्यांसाठी ही महत्त्वाची बाब तर आहेच पण, प्रवाशांसाठीसुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे. रॅपिडो, ओला आणि उबर या कंपन्यांच्या बाईक टॅक्सी तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि इतर राज्यात सुरु होत्या, आणि आता महाराष्ट्रातही ही सेवा लवकरच सुरू होत असल्यामुळे बाईक टॅक्सी सेवा असणारे महाराष्ट्र हे १३ वे राज्य ठरणार आहे.
राज्याचे परिवहन आयुक्त असणारे विवेक भीमनकर यांनी शासन या निर्णयाबाबत अधिक माहिती देणारी अधिसूचना लवकरच जारी करणारं असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘बाइक टॅक्सी ही ॲप-आधारित फ्लीट सेवा असेल आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरेल. बाइक टॅक्सी शहरातील रहदारी कमी करण्यास मदत करू शकतात.’ सध्या मुंबई शहरात ६ लाख स्कूटर्ससह २.८ दशलक्ष दुचाकी आहेत.
फक्त १० किमी परिघात धावणार Bike Taxi
मसुद्यातील नियमानुसार, ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडे किमान ५० दुचाकींचा ताफा असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे नोंदणी शुल्क १ लाख रुपये असणे गरजेचे आहे. १० हजार पेक्षा जास्त वाहने असल्यास त्यांचे शुल्क ५ लाख रुपये इतके असेल. मुंबई शहरात बाईक टॅक्सी १० किलोमीटरच्या परिघात तर मुंबई व्यतिरिक्त इतर शहरात ५ किलोमीटरच्या परिघात चालवता येतील. सर्व बाईकमध्ये जीपीएस (GPS) सेवा असणे गरजेचे आहे. तसेच बाईक चालकांच्या मूलभूत प्रशिक्षणाची नोंदणी असणे अनिवार्य असेल.
रिक्षाचालक संघांकडून होतोय Bike Taxi ला विरोध
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा जरी ॲप आधारित कंपन्या आणि प्रवाशांकडून कौतुक केलं जातं असलं तरी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक मात्र संतप्त झाले आहेत. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून सरकारच्या या निर्णयाचा कडकडून विरोध केला जात आहे. याबद्दल बोलताना ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव म्हणाले की, ही सेवा सुरक्षित नाही. या अशा यंत्रणांवर कोणतेही नियंत्रण नाही. चालकांच्या क्रेडेन्शियल्स आणि चारित्र्य तपासणीची नीट पडताळणी केली जात नाही. आमचा बाईक टॅक्सीला आमच्या व्यवसायाच्या भीतीमुळे विरोध नाहीये तर यांच्या अनियंत्रित ऑपरेशन पद्धतीमुळे आहे.
Add Comment