Table of Contents
लोकसभा निवडणुकीनंतर उबाठा (Uddhav Balasaheb Thackeray) गटाने आपला स्ट्राइक रेट वाढवत विधानपरिषदेच्या मैदानात उत्तम कामगिरी केली आहे. कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चारही मतदासंघांसाठीच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या आणि काल (१ जुलै) रोजी त्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. काल लागलेल्या निकालाप्रमाणे ठाकरे गटाने मुंबईतील मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक या दोन्ही जागांवर बहुमत मिळवत विजय प्राप्त केला आहे. मुंबईतील पदवीधर निवडणुकीत भाजपच्या किरण शेलार यांना पछाडत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल परब यांनी नाही मारली आहे. तर, मुंबई शिक्षक निवडणुकीतही काहीसे समानच चित्र दिसून आले आहे. मुंबई शिक्षक निवडणुकीत चुरशीची लढत देत ज. मो. अभ्यंकर हे विजयी ठरले आणि पुन्हा एकदा मुंबई ठाकरेंची असल्याचे सिद्ध झाले.
अनिल परब यांनी मारली बाजी
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांना तब्बल २६ हजार १२ मतांनी पराभव केला. परब यांना एकूण ४४ हजार ७८४ मतं तर किरण शेलार यांना १८ हजार ७७२ मतं मिळाली. या निवडणुकीत एकूण ६७ हजार ६४४ इतके मतदान झाले होते. त्यापैकी ६४ हजार २२२ मते वैध तर ३ हजार ४२२ मते अवैध ठरली. उमेदवारांना जिंकून येण्यासाठी ३२ हजार ११२ मतांचा कोटा ठेवण्यात आला. परब पहिल्या पसंतीत ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयी झाले.
मुंबई मतदारसंघातही Uddhav Thackeray चे शिलेदार
मुंबई शिक्षक मतदासंघाच्या द्वीवार्षिक निवडणुकीची मतमोजणी काल नेरूळ येथे आगरी कोळी संस्कृती भवनात पार पडली. जिंकून येण्यासाठी ५ हजार ८०० इतक्या मतांचा कोटा जाहीर करण्यात आला. अखेर बाराव्या फेरीत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक मतांनी अर्थातच ४ हजार ८३ इतकी मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले.
आपल्या विजयाबद्दल बोलताना अभ्यंकर म्हणाले, “विजय मिळणार याबाबत निश्चित होतो. शिवसेनेने हा विजय खेचून आणला. माझ्याबाबत चुकीचा प्रचार केला गेला. मी अनेक वर्षांपासून शिक्षक आहे. मला कालपर्यंत निकालाची खात्री होती. ऐनवेळी काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने मतदान मिळवले. अल्पसंख्याक मतदारांच्या मतांची मला खात्री होती. गैरमार्गाने विरोधकांनी आमचे मताधिक्य कमी केलं. आमच्या कोट्यातील मते विभागली गेली. यामुळे मताधिक्य घटले.”
Add Comment