Table of Contents
विधानसभा निवडणूक सुरु होण्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात पावसाळी सुरू झाले आहे आणि अश्यातच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पात शेतकरी, विद्यार्थी, तरुणवर्ग, अल्पसंख्यकांसाठी बऱ्याच योजनांची घोषणा करण्यात आली होती. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हि योजना एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हंटले जात आहे. पण, योजनेची घोषणा झाल्यापासून त्यातल्या अटी आणि तरतुदींवर विरोधकांकाडून सतत टीका केली जात आहे आणि आता पुन्हा एकदा या योजनेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला डिवचले आहे. जाणून घेऊया काय म्हणाले विरोधक.
काय आहे लाडकी बहीण योजना?
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकार या योजनेंतर्गत योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देणार आहे. यासाठी २१ ते ६५ या वयोगटातील महिला पात्र असणार आहेत. पण सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर, या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांहून अधिक नसावे आणि त्याच्या नावावर कृषीवाहन ट्रॅक्टर वगळता इतर कोणत्याही प्रकारचे वाहन असता कामा नये. या निकषांवर तुम्ही जर पात्र ठरत असाल तर योजनेचा लाभ घेऊ शकता. पण हि योजना जाहीर झाल्या दिवासापासून विरोधक या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारवर टीका करत आहेत.
Ladki Bahin Yojana बद्दल काय म्हणाले विरोधक?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी म्हणाले कि, अनेक बहिणी या योजनेसाठी रांगा लावून उभ्या आहेत. अनेक ठिकाणी सर्वर डाऊन झाल्याने ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रत्येक बहिणीला वाटते की मला 1500 रुपये मिळणार. मात्र सरकारने अनेक नियम अटी लावल्यात, त्यामुळे अनेक बहिणीची निराशा होणार आहे. सरकारचं धोरण समजत नाही. विधवा महिलेला 1000 आणि सक्षम महिलांना 1500 नक्की सरकारचे चाललं काय?
सर्व केंद्रांवर लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी खूप गर्दी केली असताना अमरावतीत (Amravati News) लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी भाष्य करताना आमदार बच्चू कडूंनी याविषयी खेद व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. तर या योजने संदर्भात सरकारने नोंदणी प्रक्रिया रद्द करून सरसकट 21 ते 65 वर्षांच्या आतील महिला आहेत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली.
लाडकी बहीण योजना अंमलात आणण्याआधीच काँग्रेसच्या विजय वड्डेटीवारांनी एकनाथ शिंदेंना निशाणा साधत म्हंटले होते कि, हा प्रकार म्हणजे श्रेयवादाची लडाई आहे. शिवाय त्यात एकनाथ शिंदे हे कुलघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा जीआर दाखवणे बरोबर आहे का? हा हक्कभंग नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जीआर काढून या सरकारनं महिलांची फसवणूक केली आहे. कारण अर्थसंकल्पाला अजून मान्यताच मिळालेली नाही, तरी, देखील जीआर काढला गेला. हा घाईगडबडीत घेतलेला शासन निर्णय आहे. अध्यक्ष महोदयांनी देखील हा शासन निर्णय वाचून दाखवला. त्यांनी देखील कायदेशीर बाबींची शहानिशा करणं आवश्यक होतं, असंही वडेट्टीवार म्हणाले.
यासगळ्यात आता अंमलबजावणीसंदर्भात बोलताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी सुद्धा एक मागणी केली कि, राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना (Muslim Women) या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ एका उदात्त हेतूने सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे. डोमिसाईल प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.
मध्यप्रेदशात महाराष्ट्राप्रमाणे लाडली बहना योजना सुरु करण्यात आली होती आणि त्याचा भाजपाला चांगलाच फायदा झाला होता. त्यामुळे आता विधासभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना सत्ताधाऱ्यांनी ह्या योजनेची घोषणा केल्यामुळे लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी गेमचेंजर ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Add Comment