Table of Contents
जून महिन्यात किंचितही न पडणाऱ्या पावसाने, जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच धो-धो कोसळत सर्वांना हैराण केले आहे. ८ जुलै रोजी रात्री सुरू झालेला पाऊस अगदी ९ जुलैच्या दुपारपर्यंत कोसळला. या पावसामुळे रात्री लोकांच्या घरात पाणी शिरलं, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं, मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा ठप्प झाली, गाड्यांच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीमुळे लांबच-लांब रांगा लागल्या आणि लोक मेटाकुटीला आले.
Mumbai शहरात अतिवृष्टीमुळे शाळा आणि महाविद्यालय बंद?
गेल्या काही तासांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण, रत्नागिरी आणि कोकणातील इतर जिल्ह्यात थैमान घातले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, आणि त्यामुळे बृहन्मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. आज अर्थातच ९ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयं अतिवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच, महत्त्वाच्या कामानिमित्त किंवा गरज असेल तरच बाहेर पडा अशी सूचना देखील प्रशासनाने सामान्य नागरिकांना दिली आहे.
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिका (TMC) आणि कल्याण डोंबिवली महानगपालिका (KDMC) क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय सुद्धा ९ जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पावसाचा तडाखा बसल्यामुळे नवी मुंबई भागातील शाळांना देखील नवी मुंबई महानरपालिकेच्या (NMMC) सूचनेवरून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच या भागात देखील रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
७ जुलैच्या रात्री उशिरा पावसाने जोर धरायला सुरुवात केली आणि सकाळपर्यंत एकूण ३०० मिमी पाऊस ६ तासात पडल्याची नोंद करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील मिलन सबवे, मालाड सबवे, हिंदमाता या मोक्याच्या ठिकाणी पाणी भरले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे रेल्वेसेवाही ठप्प झाली होती. वडाळा, दादर सारख्या रेल्वे रुळांना नदीचे स्वरूप आले होते. काल पडलेल्या पावसामुळे बरेच लोक कामावरून लवकर निघाले होते. शाळांनाही मुलांना लवकर घरी सोडण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच किनाऱ्यालगतच्या भागात अलर्ट जरी करण्यात आले होते. आपत्तीग्रस्त ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ पथकं देखील तैनात करण्यात आली होती.
Add Comment