Table of Contents
भाईंदर परिसरात कालपासून पडलेल्या पावसामुळे लोक अक्षरशः त्रस्त झाले होते, त्याचबरोबर येथील आज हळू हळू पूर्वपदावर येत आहे, आणि अशातच भाईंदर स्थानकाच्या परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. भाईंदर स्थानकात सकाळी एका पिता-पुत्राने एकत्र आत्महत्या केल्यामुळे ही खळबळ माजली आहे. सकाळी सुमारे १०.३० च्या आसपास हि घटना भाईंदर स्थानकाच्या परिसरात घडली. आत्महत्या करणारे हे पिता-पुत्र नालासोपारा येथील रहिवासी होते. आत्महत्या करणाऱ्या दोघांपैकी वडिलांचे नाव हरीश मेहता असे असून ते ६० वर्षांचे होते. तर,जय मेहता असे मुलाचे नाव असून तो ३५ वर्षांचा होता.
Bhayandar स्थानकावर घडलेल्या घटनेचे फुटेज व्हायरल
या दोघांनी केलेल्या या आत्महत्येचे समोर आलेले फुटेज सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फुटेजनुसार दोघेही एकमेकांशी गप्पा मारत ६ क्रमांकाच्या फलाटावरून विरारच्या दिशेने चालत जाताना दिसत आहेत. पण, विरारहुन चर्चगेटला जाणारी ट्रेन भाईंदर स्थानकावरून जायला वेग धरू लागल्यानंतर दोघेही प्लॅटफॉर्मवरून उतरून रुळावर आले. दोघेही अचानक ट्रेनसमोर आल्यामुळे मोटरमनला ट्रेनचा स्पीड कमी करता आला नाही, आणि ट्रेनखाली आल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
आत्महत्येचे कारण अस्पष्टच…
घटना स्थळी पोहोचत आत्महत्या करणाऱ्या दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पण, हरीश मेहता आणि जय मेहता यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. वसई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, दोघांकडे कोणत्याही प्रकारची सुसाईट नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पोलीस दोघांच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पावसामुळे काल दिवसभर त्रस्त झालेल्या मुंबईकरांमध्ये या घटनेमुळे बरीच खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे या घटनेचा विडिओ देखील सोशल मीडियावर बराच वायरल होत आहे. या वीडियोवर प्रतिक्रिया देत सोशल मिडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या आत्महत्येच्या कारणाची विचारणा केली आहे.
Add Comment