Table of Contents
मुंबई : मुंबईतील आईस्क्रीममध्ये मांसाचा तुकडा सापडण्याची घटना ताजी असतानाच आता भारतातील प्रसिद्ध कंपनी अमूल (Amul Icecream) यांच्या आईस्क्रीममध्ये गोम सापडल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. पण, व्हिडिओ व्हायरल होताच अमूलने (Amul) या तक्रारीची दखल घेतली आहे. नोएडातील एका महिलेने अमूल कंपनीच्या आईस्क्रीममध्ये गोम सापडल्याचा दावा केला. त्यानंतर तिने त्यासंबंधीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काहीच दिवसात अमूलने तो आईस्क्रीमचा डबा महिलेला पुढील तपासणीसाठी कंपनीला परत पाठवण्यासाठी सांगितला.
अमूलच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित
अमूल (Amul) अनेक वर्षांपासून देशात एक मोठा डेरी ब्रँड म्हणून कार्यरत आहे. देशात सर्वत्र त्यांचे प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आणि अशातच आता हा गोम असलेल्या आईस्क्रीमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अमूल कंपनीच्या प्रॉडक्ट्सच्या निर्मितीबाबत आणि गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण केला जातोय. यानंतर आता निर्णायक पाऊल उचलत अमूलने तो आईस्क्रीमचा डबा टेस्टिंगसाठी मागवला आहे.
अन्न विभागाची कारवाई, महिलेला पैसे परत
या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचताच त्यांनी तपासला सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलेने एका इन्स्टंट ऑनलाईन ॲपवरून हे आईस्क्रीम मागवले होते. तिने आईस्क्रीमचा डबा उघडताच तिला त्यात गोम दिसली आणि त्यानंतर तिने ॲपच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला आणि तिला तिचे पैसे परत मिळाले.
तसेच अन्न सुरक्षा विभागाने आईस्क्रीम विक्रेत्या दुकानावर देखील कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांनी अन्न आणि पुरवठा विभागाचे एक पथक त्या दुकानावर पाठवून त्यांच्या आईस्क्रीम विक्रीवर तत्काळ बंदी घातली. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे देखील सांगितले आहे.
अमूल कंपनीने (Amul) दिले स्पष्टीकरण..
अमूल कंपनीने (Amul company) या प्रकरणावर तत्काळ आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी सांगितले की, महिला ग्राहकाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. घटनेची माहिती मिळताच आम्ही सतत ग्राहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री ९.३० नंतर त्यांना भेटायला बोलावले. भेटीदरम्यान ग्राहकाकडे आम्ही आईस्क्रीमच्या डब्याची मागणी देखील केली. पण,महिलेने डबा देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणी आम्हाला तपास करणे कठीण जात आहे. तसेच ही गोष्ट आमच्या पॅकिंग आणि पुरवठा साखळीसाठी खूप महत्वाची आहे.
अमूल (Amul) प्लांट हा आयएसओ प्रमाणित आहे. येथे प्रॉडक्ट्सची विविध गुणवत्तेच्या आधारे तपासणी केल्याशिवाय ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात नाहीत. याशिवाय आम्ही ग्राहकांना प्लांटला भेट देण्यास सांगितले आहे. तेथे स्वच्छतेचे आणि गुणवत्तेचे किती पालन केले जाते हे ते स्वतः पाहू शकतात. अमूलची उत्पादने ५० हून अधिक देशात पाठवली जातात. ग्राहकांना पौष्टिक आणि आरोग्यदायी उत्पादने आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि तसेच अन्न सुरक्षेच्या सर्वोच्च मानकांचे देखील पालन करतो.
Add Comment