News

मुलांना पुन्हा जडलं Blue whale खेळाचं व्यसन, पुण्यात एकाचा मृत्यू

Untitled design 47
८ वर्षांनंतर Blue whale गेम परतला

अलीकडे मोबाईल गेमच्या आहारी जाऊन टोकाचं पाऊल उचलत जीव दिल्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच. आता अजून एक बातमी समोर येत आहे. यात पुण्यातील १०वीत शिकणाऱ्या एका मुलाने ब्लु व्हेल (Blue whale) या खेळाच्या आहारी जात आपला जीव दिल्याची बातमी समोर येत आहे. तब्बल ८ वर्षांनी हा खेळ पुन्हा आला आहे. ८ वर्षांपूर्वी अनेक मुलांनी या खेळाच्या आहारी जात खेळातील (Blue whale) वेगवेगळी आव्हान पुरी करण्यासाठी कोणत्याही थराला जात जीव दिला होता, आणि असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे.

दहावीत शिकणाऱ्या पुण्यातील मुलाला मोबाईल गेमचं व्यसन लागलं. या व्यसनाच्या तो इतका आहारी गेला की खेळतील उंचावरून उडी मारण्याचा टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने चक्क इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारली. या संपूर्ण घटनेत त्याचा मृत्यु झाला आहे. ही घटना पुण्यातील असून पुणे मुंबई एक्स्प्रेस वे जवळील किवळे गावात ही घटना घडलीय. दहावीत शिकणारा हा मुलगा ब्लू व्हेल (Blue whale) गेमच्या आहारी गेला होता.

तब्बल सहा महिन्यांपासून तो हा गेम खेळत होता आणि, अखेर २६ जुलैला त्याच्या या (Blue whale) व्यसनाने त्याचा जीव घेतला. हा गेम खेळायला मिळावा म्हणून या मुलाने स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घ्यायला सुरुवात केली. लहानसहान गोष्टींना घाबरणारा मुलगा चाकुची मागणी करायला लागल्यावर पालकांना चिंता वाटू लागली. तो खोलीत एकटाच बडबड पण करायला लागला.
खेळातील वेगवेगळ्या आणि भयानक टास्कमुळे त्याच्यात हा बदल झाला होता.

Blue whale गेमने घेतला मुलाचा जीव…

Blue whale गेमने घेतला मुलाचा जीव…
Image Source: Hindustan Times

पावसामुळे २५ जुलैला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पण तो संपूर्ण दिवसही त्याने खेळ खेळण्यात घालवला. मग अनेक विनवण्या केल्यावर तो मुलगा काहीवेळ जेवायला बाहेर आला. पण, त्यानंतर तो पुन्हा गेम खेळायला खोलीत गेला. दुसऱ्या मुलाला ताप आल्यामुळे त्याची आई तिथेच बसून होती. रात्री एक वाजता सोसायटीत एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याची माहिती व्हॉट्सअँप ग्रूपवर आली. त्याच्या आईने लगेच त्याच्या खोलीकडे धाव घेतली. पण, खोली आतून बंद होती. मग, तिने दुसऱ्या चावीने खोली उघडली आणि पाहते तर काय तो मुलगा तिथे नव्हता.

ती लगेच धावाधाव करत खाली आली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. मुलाला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोवर उशीर झाला होता. मुलाच्या खोलीची पाहणी केली असता, त्याच्या खोलीत अनेक कागद सापडले ज्यात कोडींगच्या भाषेत अनेक विचित्र टास्क लिहिले होते. एका कागदावर घराचं चित्र होतं, ज्यात गॅलरीतून उडी मार, असा टास्क लिहिण्यात आला होता. त्यामुळे हा टास्क पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने उडी मारत स्वतःचं आयुष्य संपवलं. मोबाइलचं व्यसन आणि पालकांचं दुर्लक्ष हे वाढतं चिंतेचं कारण आहे. त्यामुळे येत्या काळात असे गेम बॅन करण्याची मागणी अनेक पालक प्रशासनाकडे करत आहेत.