Table of Contents
मध्यरेल्वे मार्गावरील दादर (Dadar) अत्यंत महत्त्वाचे आणि वर्दलीचे स्थानक मानले जाते. पण, काही दिवसांपूर्वी मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह असलेली सुटकेस आढळली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. या प्रकरणी जय चावडा (Jay Chavda आणि शिवजीत सिंग (Shivjeet Singh) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी त्यांच्या मित्राचा अर्थातच अर्शद अली सादीक अली शेख याचा खून करून त्याचा मृतदेह बॅगेत कोंबला आणि या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा ही सुटकेस तुतारी एक्स्प्रेसने (Tutari Express) कोकणात घेऊन चालला होता. (Dadar Suitcase Murder)
मात्र, रेल्वे पोलिसांना जयचा संशय आला. त्यांनी त्याची बॅग तपासली आणि त्यात पोलिसांना रक्तबंबाळ झालेला अर्शदचा मृतदेह आढळला. मृत अर्शद अली सादीक शेख, आणि आरोपी जय चावडा आणि शिवजीत सिंह तिघेही मूकबधिर होते आणि एकमेकांचे चांगले मित्र देखील. नेहमीप्रमाणे तिघेही रविवारी दारू पित बसलेले, पण शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादीक शेख यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यातूनच शिवजीत सिंहने अर्शद अली सादीक शेख याचा खून केला.
पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, मूकबधिर अर्शद हा कलिना सांताक्रुझ परिसरात राहत होता. तो विवाहित असून त्याला दोन मुलं होती. तो छोटी-मोठी काम करून स्वतःचं आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भरत होता. एका क्रिकेट मॅचदरम्यान त्याची ओळख पायधुनी येथे राहणाऱ्या जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग यांच्याशी झाली. जय हा एका श्रीमंत परिवाराचा भाग असून तो अंधेरीतील लॅबमध्ये ऍनिमेशनचे काम करतो. तर, शिवजीत हा एक बेरोजगार आहे. प्रत्येक रविवारी ते जयच्या घरी दारूची पार्टी करत. पण, यावेळी दारूच्या नशेत असलेल्या अर्शद आणि शिवजीतमध्ये अर्शदच्या बायकोवरून वाद झाले.
भांडण विकोपाला गेल्यावर शिवजीतने अर्शदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याच्या अंगावर फोडलेल्या दारूच्या बाटलीने तो ओरखडे काढू लागला. त्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ जयने मोबाइलमध्ये शूट केला आहे. ज्यात शेवटी एका हातोड्याने तो अर्शदच्या डोक्यात प्रहार करताना दिसत आहे. त्यानंतर जयला पण जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तो अर्शदचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तयार झाला.
Dadar मधील या प्रकरणाचे तीन अँगल कोणते?
पोलिसांनी जेव्हा दादर परिसरात (Dadar) घडलेल्या या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना जय आणि शिवाजित यांच्या बोलण्यात तफावत जाणवली. त्यामुळे सुरुवातीला, या दोघांनी एका मुलीच्या प्रकरणावरून अर्शदचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर आले. मग, अर्शदने शिवजीकडून दोन लाख रुपये घेतले होते, आणि त्याने ते अद्याप परत न केल्यामुळे हा वाद झाला असाही एक अँगल समोर.
त्याचप्रमाणे जयने अर्शदच्या खुनाचा जो व्हिडिओ शूट केलाय. त्यात शिवजीतने एका तरुणीसह दोघांना व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडिओ कॉलमधील तरुणी अर्शदला जीवे मारण्यासाठी शिवजितला प्रोत्साहित करत होती. तसेच, या व्हिडिओ कॉलमधील ही व्यक्ती दुबईत असल्याचा आरोप केला जात आहे. या अनुषंगाने पोलिसांनी जरी तपास सुरू केला असला तरी, सांताक्रूझमधील या खुनाचा दुबईतील त्या व्यक्तीची काही संबंध आहे का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Add Comment