Table of Contents
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. पोस्टर लॉन्च सोहळ्याच्यावेळी फक्त एकनाथ शिंदेच नाही तर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), महेश कोठारे (Mahesh Kothare), बॉबी देओल (Bobi Deol) असे सिनेसृष्टीतील मोठे कलाकार देखील चित्रपटातील कलाकारांसह उपस्थित होते.
येत्या ९ ऑगस्ट रोजी धर्मवीर २ (Dharmaveer 2) प्रेसक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मवीर या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नेमकं काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंग दरम्यान निर्माते मंगेश देसाई यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की धर्मवीर २ हा चित्रपट फक्त मराठी भाषेत नाही तर हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हा चित्रपट पाहता येईल.
दुसऱ्या भागात दिसणार का शिंदेंची कहाणी?
धर्मवीर २ या चित्रपटात क्षितिज दाते हा एकनाथ शिंदेंची तर प्रसाद ओक हा आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. पण मग आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एकनाथ शिंदेंची कहाणी देखील उलघडली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चित्रपटाला धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असे चित्रपटाला नाव देण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पात्र चित्रपटात असणार की याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.
धर्मवीर २ या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली असून, प्रवीण तरडे (Praveen Tarde) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिंदे यांचा सुरत, गुवाहाटी ते मुंबई असा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार का? याची देखील सर्वांना उत्सुकता लागली आहे.
Dharmaveer 2 काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री शिंदे यांनी या सिनेमासाठी शुभेच्छा देत म्हटलं की, मी धर्मवीर-2 सिनेमाचं आणि मंगेश देसाई यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जेव्हा त्यांनी धर्मवीर हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी मला या सिनेमासाठी सहकार्य हवं असं म्हटलं. त्यांच्या सिनेमासाठी मदत करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. कुठल्याही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयात आनंद दिघेंनी अढळ स्थान निर्माण केलं होतं. आनंद दिघेंचं कार्य हे एका सिनेमात उलगडूच शकत नाही. लोकांपर्यंत ते पोहचूच शकत नाही. त्यामुळे पहिला सिनेमा काढल्यानंतर लोकांना वाटलं आता पुढे काय? आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागातून त्या गोष्टी समोर येणार आहेत. तसेच यावेळी चित्रपटाबद्दल बोलताना एकनाथ शिंदेंनी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याचे देखील कौतुक केले.
Add Comment