Table of Contents
जवळपास आठ महिन्यांपूर्वी भारतीय नौदल दिनादिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पण, २६ ऑगस्ट रोजी हाच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यामुळे आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
महविकास आघाडीसह राज्यातील अनेक शिवप्रेमी सरकारवर संतापले आहेत. या पुतळ्याचे लोकार्पण करणाऱ्या नरेंद्र मोदींवर आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी तर चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेच्या खासदार (बारामती) सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवरून टीका केली आहे. सुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलं होतं. त्याने आपले काम कसं केलं होतं हे आता उघड झालं आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवं, अशी आमची मागणी आहे”.
सुप्रिया सुळेंच्या टीकेवर काय म्हणाले Eknath Shinde?
सुप्रिया सुळे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “टीका करायला त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही. मी एवढंच सांगतो की झालेली घटना खूप दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. तसेच त्या पुतळ्याचं लोकार्पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला मी देखील उपस्थित होतो. शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि त्यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच त्या ठिकाणी पुन्हा नव्याने उभारला जाईल, याबाबत मी सर्वांना आश्वस्त करतो”.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचं डिझाईन देखील त्यांनीच तयार केलं होतं. हा पुतळा कोसळल्याचं वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला घटनेची माहिती देताना सांगितलं की ही घटना घडली तेव्हा त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं”.
Add Comment