Table of Contents
वर्षागणिक मराठी चित्रपट नवनवीन उंची गाठत आहेत. पूर्वीपेक्षा जास्त प्रयोगशील बनत आहेत. पण असं असूनही, कौटुंबिक विषयावर आधारित मराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. मराठी सिनेसृष्टीतील कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट म्हणजे प्रत्येकाच्या घरातली आणि प्रत्येकाच्या मनाला भिडणारी गोष्ट, आणि येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणारा आणि घरोघरी एका नव्या कुटुंबाची गोष्ट पोहोचवणारा असाच एक चित्रपट म्हणजे घरत गणपती (Gharat Ganpati).
घरत गणपती हा चित्रपट कोकणात मोठ्या दणक्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाशी संबंधित कथेवर आधारित आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे सर्वांना एकत्र बांधणारा सण. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मज्जा करायला लावणारा, गप्पा-गोष्टी करायला लावणारा आणि विविध पिढ्यांना जोडणारा सण. या चित्रपटाची निर्मिती नम्रता बांदिवडेकर, नवज्योत बांदिवडेकर, गौरी कालेलकर चौधरी, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली असून. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Gharat Ganpati च्या दिग्दर्शकाबद्दल काय म्हणाले अजिंक्य देव?
घरत गणपती (Gharat Ganpati) चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांच्याविषयी बोलताना अजिंक्य देव म्हणाले, “या इंडस्ट्रीसाठी आणि येणाऱ्या मराठीसाठी आणि भविष्यातील स्वातंत्र्यासाठी नवज्योत खूप चांगला दिग्दर्शक आहे. आज या दिवशी आपण इथे उभे आहोत, नवज्योतचा मी खूप आभारी आहे ज्याने मला या चित्रपटात कास्ट केले आहे. त्यामुळे आता एक मोठा दिग्दर्शक सिनेसृष्टीला मिळणार आहे. घरत गणपती हा सिनेमा येत्या २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाची तगडी स्टारकास्ट कोण?
घरत गणपती चित्रपटात नव्या आणि ज्येष्ठ अशा मराठी कलाकारांची तगडी स्टाकास्ट आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात अश्विनी भावे, अजिंक्य देव, निकिता दत्त, भूषण प्रधान, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, सुषमा देशपांडे, डॉ. शरद भुताडिया, आशिष पाथोडे, परी तेलंग, रुपेश बने, समीर खांडेकर, राजसी भावे, दिव्यलक्ष्मी मैस्मान दिसून येणार आहेत. हा चित्रपट पॅरानोमा प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून प्रदर्शित केला जात आहे. प्रेक्षकांनी यापूर्वी प्रदर्शित झालेल्या अनेक मराठी कौटुंबिक चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला होता आणि या चित्रपटालासुद्धा प्रेक्षक असेच प्रेम दर्शवतील अशी आशा अभिनेत्यांनी आणि दिग्दर्शकाने व्यक्त केली आहे.
Add Comment