Table of Contents
भारत हा एक शेतीप्रधान देश मानला जातो. महाराष्ट्रासह भारताच्या इतर भागात विविध पिकांची लागवड केली जाते. पण, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, बदलतं वातावरण आणि नापीक जमीन यामुळे अलीकडे शेतकरी नाईलाजास्तव मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर करू लागला आहे. त्यामुळे अलीकडे शेतीसाठी अत्यंत आवश्यक असणारी ही कीटकनाशकं कृषिकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पण, अनेकदा कीटकनाशकांची खरेदी न झाल्यामुळे ती केंद्रात तशीच पडून राहतात आणि कालांतराने ती मुदतबाह्य होतात.
Expired Pesticides चं करावं तरी काय?
मग आता या अशा मुदतबाह्य ठरत चाललेल्या या कीटकनाशकांचं करावं तर काय हा प्रश्न कृषीकेंद्र चालकास देखील पडतो. मुदतबाह्य कीटकनाशकांची योग्य ती विल्हेवाट न लावल्यास ती पर्यावरणासाठी धोका देखील ठरू शकतात. कीटकनाशकांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची असेल तर त्याकरिता, ‘इव्हॅक्युएटर’ या यंत्राची गरज आहे.
हे आकाराने फार मोठे आणि महागडे असे यंत्र आहे जे फक्त मोठ्या कंपन्यांकडे उपलब्ध असते. कीटकनाशक बनवणाऱ्या कंपन्यांकडे हे यंत्र असते, आणि त्यामुळे कीटकनाशकांच्या विल्हेवाटीची जबाबदारी या कंपन्यांनीच घ्यावी असे शासनाने सांगितले आहे. पण, शासनाच्या या निर्देशांना कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे आता यावर सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी कृषी केंद्र चालक करत आहेत.
मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीकरिता अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता कृषिमंत्र्यांसह आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. पण, त्याचा लाभ झाला नाही. कंपन्यांना वारंवार मागणी केली, त्याचाही लाभ झाला नाही. याकरिता अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. – रवी शेंडे, अध्यक्ष, कृषी व्यवसायी संघ.
अशा अघोरी पद्धतींनी लावली जाते Expired Pesticides ची विल्हेवाट
शासन आणि कीटकनाशक बनवणाऱ्या कंपन्या या दोन्ही घटकांकडून महत्त्वाच्या असणाऱ्या पण शुल्लक वाटणाऱ्या या विषयाकडे कानाडोळा केला जात असताना. कृषीकेंद्र चालक आणि इतर विक्रेत्यांकडून त्यांच्याकडे पडून असलेल्या मुदतबाह्य कीटकनाशकांचा निकाल लावण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. ज्यात बहुतांश पद्धती या जीवितहानी देखील करू शकतात.
यातील पहिला प्रकार म्हणजे अनेक कृषी केंद्र चालकांकडे स्वतःचे शेत असते. ते कुणाला तरी शेतीसाठी देतात किंवा मग कामगार कमी लावून शेती करत असतात. अशा अनेकदा ही मुदतबाह्य कीटकनाशके वाया जाऊ नयेत किंवा आपले नुकसान होऊ नये या उद्देशाने ते स्वतःच्याच शेतात वापरतात. ज्यामुळे शेतात राबणाऱ्या गोरगरीब कामगारांच्या जीवाचा प्रश्न उभा राहतो.
दुसरं म्हणजे भारत जरी कृषिप्रधान देश असला तरी इथला बळीराजा काही तितकासा श्रीमंत नाही. आताच्या काळात अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी रोज नव्या संकटात सापडत चालला आहे. अशातच जर एखाद्या गरीब शेतकऱ्याला कमी किंमतीत कीटकनाशके हवी असतील तर त्याला ही अशी मुदतबाह्य कीटकनाशके विकली जातात. ज्यामुळे शेतकऱ्याचा जीव तर धोक्यात येतोच पण त्याचबरोबर त्याच्या पिकांचेसुद्धा नुकसान होते.
Add Comment