Table of Contents
महाराष्ट्र एकीकडे मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू आहे. तर, दुसरीकडे आता बालभारतीकडूनच मराठी भाषेचा अपमान केला जातोय. इयत्ता पहिल्या बालभारती पुस्तकात पूर्वी भावे या मराठी अभिनेत्री, निवेदिका असणाऱ्या कवयित्रीने लिहिलेल्या कवितेमुळे वाचकांकडून पूर्वी भावे आणि बालभारतीवर टीका केली जात आहे.
‘जंगलात ठरली मैफल’ असे कवितेचे नाव असून, कवितेत करण्यात आलेली चुकीची वाक्यरचना आणि इंग्रजी शब्दांचा वापर यामुळे सोशल मीडियावर ही कविता चांगलीच ट्रोल होतेय. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून इयत्ता पहिली ते सातवीची पुस्तकं प्रकाशित करण्यात येतात, आणि याच पुस्तकात आता मराठी भाषेचे वाभाडे काढणारी कविता छापून आल्यामुळे वाचक संताप व्यक्त करत आहेत.
Marathi कविता नेमकी काय?
‘जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
सोशल मीडियावरील वाचक काय म्हणाले?
ही कविता ऐकून सोशल मीडियावर बरीच टीका केली जातेय. रोहन नामजोशी नामक फेसबुक वापरकर्त्याने लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मुळात ही कविता अतिशय भंगार आहे. ‘स्वप्नात पाहिली राणीची बाग’ या विंदांच्या कवितेला समोर ठेवून रचल्यासारखी वाटतेय. पहिल्या ओळीत लिहिलंय ही हत्तीची अक्कल.. बहुतेक सुबुद्धी म्हणायचं असेल कवयित्रीला. कारण वाचताना.. ही ही.. हत्तीची अक्क्ल असं वाटतंय (म्हणून बघा एकदा).
‘तबल्यावर होती कोल्होबाची साथ, वाघोबा म्हणाले नाही ना बात?’ म्हणजे. कहना क्या चाहते हो? म्हणजे नीट जमलं नाही असं म्हणायचं असेल. बात हिंदी शब्द हा भाग आणखी वेगळा. क्या बात है पूर्वी ताई. पुढे जाऊन आधुनिक दुर्बोध कवयित्री होणार तुम्ही. ‘संतूर वाजवू म्हणाले चिकी मिकी माऊस..’ मी एवढा हसलो ना या ओळीवर.. अबे काय आहे हे? ते लांडगे म्हणजे एक वर्षांच्या अंतराने झालेले जुळे भाऊ वाटताहेत. पान लावताना फक्त त्या चित्राचा साईज कमी केला आहे बहुतेक. मुंगीने लावला वरचा सां…. असा लागतो सां.. आवाज आवाज ओरडला ससा… हाहाहाहहाहाहाहहा…. अरे काय हे?’
‘पण खरं सांगायचं तर भावे बाईंची तरी काय चूक म्हणा. एक तर आपल्याकडे कवी- कवयित्री नाहीत. कवी आहेत म्हटल्यावर लोक त्यांची थट्टा करतात. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठीत काहीतरी लिहिणार म्हणजे कवयित्रीला मानधन देताना बालभारतीला फेफरे आले असणार. आपल्या दर्जेदार साहित्य हवं असतं पण दर्जेदार पैसे द्यायचे नसतात. मग तुमच्या वाट्याला हेच येणार. म्हणजे कमी पैसे घेतले म्हणजे घाण लिहायचं असा त्याचा अर्थ नाही. पण का लोक क्रिएटिव्ह होतील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कवितेला मान्यता देणाऱ्यांची कीव येते. भावे बाई काही लिहितील, तुम्ही मान्य कसं करता? पुन्हा मामला तोच. जे नीट लिहितात किंवा लिहू पाहतात त्यांना नीट वागवायचं नाही, संधी द्यायची नाही, त्यांचा मान नाही धन त्याहून नाही. मग हेच तुमच्या पोरांना वाचायला लागणार.’
Add Comment