Table of Contents
पालघर येथील वाढवणं येथे बंदर उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मांडण्यात आला होता. 1998 मध्ये सर्वप्रथम हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण, स्थानिक रहिवासी आणि मच्छीमारांचा विरोध पाहता हे बंदर (Vadhavan Port) रद्द करण्याची मागणी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यावेळी केली होती. पण, 2014 साली महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार आले आणि वाढवण बंदर (Vadhavan Port) बांधण्याच्या हालचाली पुन्हा वेग घेऊ लागल्या. ७६ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पामुळे, पुढील १० वर्षांत जवळपास १२ लाख रोजगार निर्माण होईल, असा अंदाज सरकारने वर्तवला आहे.
लोकांचा तीव्र विरोध असतानाही या वाढवण बंदराचे (Vadhavan Port) भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे सरकार हा प्रकल्प लोकांच्या फायद्याचा असल्याचे म्हणत आहे. तर दुसरीकडे वाढवण बंदरामुळे (Vadhavan Port) नुकसान होईल असे मत स्थानिक व्यक्त करत आहेत. भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालानुसार समुद्रातील एकूण ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे डहाणू, मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी वेथील मासेमारी बाधित होईल, असे स्थानिकांचे मत आहे.
सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत भूमिपूजनाच्या दिवशी आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. उत्तन भागात ही बैठक बोलावण्यात आली होती. या सभेला मुंबई, ठाणे आणि पालघर येथील अध्यक्ष देखील उपस्थित होते. तसेच मच्छीमारांसाठी हा नवा प्रकल्प कसा नुकसानदायक ठरू शकतो, यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.
वाढवण बंदराच्या (Vadhavan Port) भूमीपूजनाच्यावेळी ‘सरकारच्या प्रेतयात्रा’ हे आंदोलन केले जाणार आहे. ज्यात मोठ्या संख्येने लोक सामील होणार आहेत. तसेच वसईत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत लोक निषेध व्यक्त करणार आहेत. तर दुसरीकडे, उत्तन, मढ़, मर्वे, गोराई येथील मच्छीमार जलसमाधी घेऊन आणि काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवणारा आहेत, अशी माहिती माहिती समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी दिली.
पंतप्रधान मोदी करणार Vadhavan Port चे भूमिपूजन
“वाढवण बंदर (Vadhavan Port) उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छीमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छीमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत. विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि अशा विध्वंसक प्रकल्पांना विरोध हा समाज शेवटपर्यंत करीत राहणार आहे,” असे मत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः वाढवण बंदराचे भूमिपूजन व अन्य कार्यक्रमांसाठी पालघर दौऱ्यावर येणार असल्यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी सर्व अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून ते शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ४८ वरून दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांची वाहतूक स्थगित करण्यात येणार आहे.
Add Comment