Table of Contents
मराठी चित्रपट फार आधीपासून अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट लोकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटांच्या माध्यमातून बरेचसे विचार लोकांच्या समोर मराठी सिनेसृष्टीने मांडले आहेत. असाच काहीसा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते अशोक सराफ या नव्या चित्रपटात दिसून येणार आहेत. अशोक सराफ यांना बहुतांश चित्रपटात आपण विनोदी भूमिका साकारताना पहिले आहे. त्यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांनी अक्षरशः पोट धरून प्रेक्षकांना हसायला भाग पाडले आहे.
पण एका नव्या जॉनरच्या चित्रपटात आता अशोक सराफ दिसणार आहेत. अशोक सराफ (Ashok Saraf) आणि माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) या दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘लाईफलाईन’ (Lifeline) हा चित्रपट येत्या २ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लाईफलाईनच्या (Lifeline) ४० सेकंदाच्या या टीजरमध्ये अशोक सराफ एका नामवंत डॉक्टरच्या भूमिकेत तर माधव अभ्यंकर एका पारंपरिक किरवंताच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे हा चित्रपटात पारंपरिक रूढी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील वादविवादावर आधारल्याचे दिसून येत आहे. हातावर रेखाटलेली जीवनरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे एकंदरीत तंत्रज्ञानातील आधुनिकता आणि पारंपारिक रूढी-परंपरा यांच्या संघर्ष या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
Lifeline चित्रपटात दिसणार ‘हे’ कलाकार?
या चित्रपटाची निर्मिती लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट यांनी केली आहे. तर, साहिल शिरवईकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, राजेश शिरवईकर यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहले आहेत. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्या व्यतिरिक्त हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर हे कलाकार सुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
काय म्हणाले दिग्दर्शक?
लाईफलाईन (Lifeline) या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना चित्रपटाचे दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणाले, “आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज या चित्रपटाला लाभले आहेत. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ‘लाईफलाईन’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिने-सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे.”
Add Comment