Table of Contents
पुण्यातील पोर्शे हिट अँड रन (Hit and Run) केसमधून महाराष्ट्र सावरत असताना, वरळीत घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ माजली आहे. मुंबईतील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या वरळी या भागात रविवारी (७ जुलै २०२४) पहाटे ही घटना घडली.पहाटेच्या सुमारास माश्यांचा लिलाव करून कावेरी नाखवा (Kaveri Nakhava) आणि त्यांचे पती स्कुटरवरून बाजारातून परतत होते, आणि त्याचदरम्यान मिहीर शाह (Mihir Shah) याने त्यांच्या स्कुटरला आपल्या आलिशान बीएमडब्ल्यू कारने धडक मारली. हा अपघात इतका भीषण होता कि, कावेरी नाखवा यांना या अपघातात त्यांचा जीव गमवावा लागला.
त्यानंतर त्यांच्या या अपघाताची कोणत्याही प्रकारची जबाबदारी न घेता, मिहीर शाह (Mihir Shah) तिथून पळून गेला. तसेच त्याच्या वडिलांनी म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांनीही बीएमडब्ल्यू कारवर असलेला शिवसेनेचा लोगो मिटवण्याचा प्रयत्न करत मिहीर शाहला हा गुन्हा लपवण्यात मदत केली. हा संपूर्ण प्रकार समोर येताच पोलिसांनी तर राजेश शाह यांच्यावर अटक करत कारवाई तर केलीच आहे. पण, आता शिवसेना शिंदे गटानेसुद्धा त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवेसना शिंदे गटाच्या उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Worli Hit and Run केसमधील आरोपीला होणार शिक्षा?
कावेरी नाखवा यांना गाडीखाली चिरडल्यानंतर मिहीर शाहने संबंधित घटनास्थळावरून पळ काढला. या सर्व प्रकरणाचा शोध सुरु झाल्यावर मिहीर शाह हा आरोपी असल्याचे आढळताच त्याचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्या वडिलांना शिवसेना नेते राजेश शाह यांना ताब्यात घेतले. पण, काही वेळाने त्यांनाही जमीन मिळाला आणि ते तुरुंगातून बाहेर आले. पण, मग त्यानंतर मात्र पोलिसांनी मिहीर शाहचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली.
पोलिसांना लोकेशन ट्रेस करता येऊ नये म्हणून, मिहीरने त्याचा आणि त्याच्या मित्राचा मोबाईल बंद केला होता. मिहीर शाह त्यानंतर शहापूरला पळून गेला. तिथे तो त्याच्या मित्रांसह आणि कुटुंबासह एका रिसॉर्टमध्ये थांबला होता. परंतु, काही वेळाने तो त्याच्या मित्रांसह विरारला पळून गेला. मिहीरच्या मित्राने मंगळवारी सकाळी फक्त १५ मिनिटांसाठी त्याचा मोबाइल सुरु केला असताना, पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले आणि मिहीरला अटक केली. एवढंच नाही तर पोलिसांनी मिहीरसह १२ जणांना अटक केली. ज्यांनी त्याला पोलिसांपासून लपून राहायला मदत केली. या १२ जणांमध्ये मिहीरची आई, बहीण आणि मित्रांचा समावेश होता. आज मिहीर शाह याला पोलिसांनी कोर्टात सादर केले असून, न्यायालयाने त्याला १६ तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे.
पीडित कुटूंबाला मिळणार आर्थिक मदत
घडलेल्या प्रकारात आरोपीला योग्य ती शिक्षा मिळेल अशी आशा असताना. माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कावेरी नाखवा यांच्या कुटूंबाला १० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Add Comment